अभिमानास्पद : रायफल शूटिंगच्या भारतीय संघात जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अलीकडेच झालेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या चार खेळाडूंची रायफल शूटिंगच्या भारतीय संघातील निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली असून ही बाब महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्यासाठी खूप आनंदाची व अभिमानाची मानली जात आहे.

अलीकडेच  भोपाळ येथे पिस्तूलच्या तर दिल्ली येथे रायफल प्रकारच्या ६६ वी राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. देशातील अतिउच्च अशा या राष्ट्रीय स्पर्धेत जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या सात खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत अतिशय उत्तम कामगिरी केली. त्यातील चार खेळाडूंनी त्यांच्या खेळात आरतीय संघातील निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण केल्याने त्यांची निवड झालेली आहे. यात १० मीटर पिप साईट एअर रायफल  किरण सुरेश पाटील;  मोहित शिवदास नाईक; निखिल धुडकू सपकाळे तर १० मीटर एअर पिस्तोल  या प्रकारात पुष्पराज नारायण वाघ ( एन.सी.सी )  यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ निवड चाचणीस पात्र झालेल्या वरील खेळाडूंचे असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी, उपाध्यक्ष प्रा. यशवंत सैंदाणे, सचिव तथा  मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, सह सचिव सुनील पाल्लवे, प्रसिद्ध प्रमुख प्रा.विनोद कोचुरे, पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक पो.ह. प्रकाश गवळी, राष्ट्रीय जुरी-जज्ज नितीन अहिरे यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रशिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content