Home Cities जळगाव महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध आंदोलन !

महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध आंदोलन !

0
243


जळगाव-लाइ्रव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कथित गैरकारभाराविरोधात सोमवार, २१ जुलै दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जळगाव ग्रामीणचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, आणि भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी तिन्ही मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

या आंदोलनात शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासोबत तालुका कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, अशोक आप्पा सोनवणे, किरण ठाकूर, लोटन सोनावणे, प्रभाकर कोळी, धनराज वारडे, रघुनाथ सोनवणे, स्वप्नील पाटील, खुशाल पाटील, राजू पाटील, अनिल बोरसे, नितीन चौधरी आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

प्रा. सोनवणे यांनी यावेळी बोलताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या करत आहेत, आणि दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात ऑनलाईन जंगली रमी खेळण्यात मग्न आहेत. याचा अर्थ त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, हमीभाव आणि भावनिक फरक यांसारख्या गंभीर समस्यांचा विसर पडला आहे.”

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही सोनवणे यांनी गंभीर आरोप केले. “एकीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे अपेक्षित असताना, गृहराज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवत आहेत,” असा दावा त्यांनी केला. तसेच, मंत्री महाजन यांचे भाजपाचे नेते प्रफुल्ल लोढा हे हनी ट्रॅप प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत अटक झाले असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.


Protected Content

Play sound