जनतेच्या प्रेमासमोर नतमस्तक : पालकमंत्र्यांचे भावोदगार !

आता 'मिशन झेड.पी.' ! निवडणुकांमध्ये भगवा डोैलाने फडकणार : ना. पाटलांचा संकल्प

पाळधी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लोकांच्या प्रेमाने आगेकूच करत राहिलो असून जनतेसमोर आपण नतमस्तक असल्याचे भावनिक उद्गार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. पाळधी ग्रामपंचायतीच्या बाजूला असणार्‍या भव्य मैदानावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनपर सभेचे आयोजन करण्यात आले होते; याप्रसंगी ते बोलत होते.

आपण वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रखर विचार प्रमाण मानून १९८४ पासून जनसेवेत कार्यरत झालो असून या सेवेतूनच आजवर मजल मारली आहे. आजवरच्या वाटचालीत अनेक चढ-उतार आले असले तरी देखील लोकांच्या प्रेमाने आगेकूच करत राहिलो. आज पाळधी येथे दिवसभर भेटून शुभेच्छा देणारे आणि आता सभेला जमलेला अफाट जनसागर पाहता लोक माझ्या सोबत असल्याचे सिध्द झाले असून याच जनतेसमोर आपण नतमस्तक होत असल्याचे भावनिक उदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले.

ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात जोरदार राजकीय टोलेबाजी करतांना केलेल्या कामांचा आराखडा मांडत जिल्हा विकासाचे व्हिजनही मांडले. शिवसेनेला सर्व ठिकाणी यश आले असले तरी अद्याप झेडपीवर भगवा फडकला नसल्याचे नमूद करत आगामी निवडणुकीत झेडपीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवाच फडकणार असल्याचा संकल्प देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाला पाळधी येथे सायंकाळी भव्य सभा होत असते. मध्यंतरी कोविडमुळे दोन वर्षे सभा झाली नव्हती. या पार्श्‍वभूमिवर, पाळधी ग्रामपंचायतीच्या बाजूला असणार्‍या भव्य मैदानावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनपर सभेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोरआप्पा पाटील, आ. चंद्रकांत पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, जळगाव ग्रामीणचे संपर्क प्रमुख अरविंद नाईक, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील व राजेंद्र चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील,  उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, गोपाल चौधरी, नाना महाजन, जनाआप्पा पाटील (कोळी),  सरपंच संघटनेचे सचिन पवार, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, धोंडू जगताप, प्रमोद सोनवणे, पारोळा येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भानुदास विसावे, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, राधेश्याम कोगटा, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, महिला महानगराध्यक्षा  शोभाताई चौधरी, सरीता माळी-कोल्हे, ज्योतीताई शिवदे, निलीमा सोनवणे,  पीआरपीचे नेते जगन सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, मुकेश सोनवणे, अमर जैन, गजानन डावरे, गुणवंत जैन, पाळधी खुर्द व बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील व शरद कोळी, उद्योगपती शरद कासट, दिलीपबापू पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, प्रेमराज पाटील, मुकुंद नन्नवरे, पप्पू भावे, राजेंद्र महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सभा सुरू होण्याआधी पाळधी शहरातून कार्यकर्त्यांनी भव्य दुचाकी फेरी काढली. संपूर्ण गावाला फेरी मारून ही रॅली सभास्थळी आली.

सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ना. गुलाबराव पाटील यांचे सभास्थळी आगमन होताच प्रचंड जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमांना वंदन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रारंभी भव्य हार अर्पण करून पालकमंत्र्यांसह सन्माननीय व्यासपीठाचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधासभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी करतांना ना. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या मनोगतातून ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा विकासाला गती मिळाल्याचे प्रतिपादन केले. आ. चंद्रकांत पाटील यांनी कोविड काळासारख्या आपत्तीतही भाऊंच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठी कामे झाल्याचा गौरव केला. सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा संगम असल्याचे नमूद केले. महापौर जयश्रीताई महाजन यांनी भाऊंच्या मदतीने जळगावच्या विकासाला प्रचंड गती मिळाल्याबद्दल आभार प्रकट केले. आ. किशोरआप्पा पाटील यांनी आपल्या मनोगतातून भाऊंच्या नेतृत्वाने अजून मोठी झेप घ्यावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शायरीने आपल्या भाषणाची सुरूवात केली. प्रारंभीच त्यांनी उपस्थित जनसागराला नमन केले. ते म्हणाले की, गेल्या काही काळात आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्याबाबत संशय व्यक्त केला जात होता. तथापि, निम्न ताप्ती प्रकल्पाला 2 वर्षात 400 कोटी रूपयांचा निधी आणण्याचे काम आपण केले आहे. आपल्या भोवती कुणी टिपटॉप माणसे नव्हे तर सर्वसामान्य लोक राहतात, आणि तेच लोक आपली शक्ती आहेत. ही शक्ती आपल्याला कायम कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली असून आपण देखील त्यांच्या अडी – अडचणीत सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या सुरू असलेल्या राजकारणात आता देव देखील वाटून घेतले जात असल्याबद्दल त्यांनी टीका केली. दूरचित्रवाणीच्या बातम्यांमध्ये सर्वसामान्यांच्या समस्या, शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणी आदींवर भाष्य करण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, गेल्या ३० वर्षांमध्ये आपण जी काही जनसेवेची कामे केलीत. ज्या प्रकारे मतदारसंघातील प्रत्येक घरी पोहचलो. लोकांच्या समस्यांचे निराकरण केले. त्याचमुळे आज ही गर्दी जमली आहे. हे आपल्या तपस्येचे फळ असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मध्यंतरी एका निवडणुकीत आपल्याला अपयश आल्यामुळे खूप नैराश्य आले. मात्र आपण दुसर्‍याच दिवशी एका मौतीच्या ठिकाणी जाऊन पुन्हा संपर्क सुरू केला. लोकांना पुन्हा जोडले. आणि यातूनच पुन्हा विजय मिळविला. या कालखंडात आपले कट्टर निष्ठावंत हे आपल्याला सोडून गेले नसल्याचा सार्थ अभिमान असल्याने ना. पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व संस्था आपल्याकडे आल्या असल्या तरी अद्याप जिल्हा परिषद आलेली नाही. आणि झेड.पी. ताब्यात घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविले. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. आपल्या पालकमंत्रीपदाचा कुणी व्यापारी वा अधिकार्‍यांना त्रास असल्याचे कुणीही सांगू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.

ना. गुलाबराव पाटील शेवटी म्हणाले की, जनतेचे प्रेम हेच  आपल्यासाठी उर्जास्त्रोत आहे. आपण कायम लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम केले आहे. संपर्क हीच श्रीमंती आणि सेवा हेच कर्तव्य असे मानल्याने आपण आजवरची वाटचाल केलेली आहे. मी कितीही मोठा झालो तरी माझे गाव आणि मतदारसंघासाठी गुलाबच आहे. याचमुळे देवाला माझी प्रार्थना आहे की, मला कधी गर्वाची बाधा येऊ देऊ नको ! माझे पाय जमीनीवरच रहावेत आणि जनतेच्या सेवेत अविरत कार्यरत रहावे हीच माझी इच्छा असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी नमूद केले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमाचे अतिशय बहारदार अशा पध्दतीत सूत्रसंचालन सचिन पाटील सर यांनी केले. तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी मानले.

 

प्रतापराव पाटील यांचे अचूक नियोजन

 

जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व शिवसैनिकांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन केलेल्या अचूक नियोजनांमुळे कार्यक्रम भव्यदिव्य झाला.

क्षणचित्रे –

 

* गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस १९९६ पासून साजरा केला जात असून तेव्हापासूनच पाळधी येथील मैदानावर नियमीतपणे सभा होते. कोविडमुळे दोन वर्षे सभा न झाल्याने यंदाच्या सभेची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

* आजवर ज्या मैदानावर सभा होत होती, ते लहान पडेल असे स्पष्ट दिसल्याने त्याच्याच बाजूच्या मोठ्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले.

* या सभेत अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली. अद्ययावत साऊंड सिस्टीम, भव्यता दर्शविणार्‍या एलईडी वॉल्स, बैठकीची चोख व सुटसुटीत व्यवस्था हे सभेचे वैशिष्ट्य ठरले.

 *सभेच्या परिसरातील गुलाबभाऊंचा भव्य कटआऊट लक्ष वेधून घेत होता. तर संपूर्ण मैदानाला लावलेल्या भगव्या पताका आणि ध्वजांमुळे वातावरण भगवेमय झाले होते.

*फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून निघाला होता. अनेक कार्यकर्ते वाजत-गाजत सभेस्थानी आले.

* नशिराबादकर कार्यकर्त्यांनी वाजत-गाजत भव्य सिंहासन आणले. गुलाबभाऊंनी त्यावर काही क्षण बसून त्यांचा मान राखला. मात्र तातडीने हे सिंहासन हलवायला सांगितले. भाऊंचा हा साधेपणा उपस्थितांना भावला.

*ना. गुलाबराव पाटील यांच्या सभेचे फेसबुक पेजवरून लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. याला प्रचंड प्रतिसाद लाभला. सोशल मीडियात वाढदिवसाचीच मोठी चर्चा दिसून आली.

* धरणगाव व पाळधी शिवसेना व युवासेनेतर्फे भव्य मोटारसायकल रॅली ठरली आकर्षण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.