जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दि. 17 नोव्हेंबर रविवार रोजी जळगाव येथे एक आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. हा विशेष विवाह सोहळा जिल्हा बँकेचे माजी अधिकारी अशोक दत्तू पाटील, रा. फैजपूर यांचे चिरंजीव भूषण अशोक पाटील तथा जिल्हा परिषद जळगावचे वरिष्ठ सहाय्यक गोपाळ पंडित पाटील यांची कन्या दिव्या गोपाळ पाटील, रा. जळगाव यांच्या विवाहासाठी आयोजित केला होता.
हा विवाह सोहळा सुद्धा इतर साधारण विवाह सोहळ्याप्रमाणेच आयोजित करण्यात आला होता. परंतु या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे होते की आयोजित करणाऱ्या दोन्ही कुटुंबांच्या वतीने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून लग्नावरती होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू व पीडित दिव्यांगांना स्वयंसिद्ध करण्याच्या उदात्त भावनेने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. याचा भाग म्हणून रेड स्वस्तिक या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने फैजपूर येथील अंकुर भारंबे या दिव्यांगाला बाजारात 50 हजार रुपये किमतीला उपलब्ध असणारा अत्याधुनिक असा इलेक्ट्रॉनिक हात आणि सुरेंद्र चव्हाण या दिव्यांगाला जयपूर फूट हा संपूर्णतः मोफत देऊन त्यांना स्वयंसिद्ध करण्यात आले.
या विशेष विवाह सोहळ्यात एक हात आणि एक पाय छत्रपती शिवाजी महाराजांचे तंजावर घराण्याचे तेरावे वंशज विजयेंद्रसिंह राजे भोसले, रेड स्वस्तिकचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर अशोकराव शिंदे, रेड स्वस्तिकचे जिल्हाध्यक्ष राजेश झाल्टे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रदान करण्यात आला. हा विशेष विवाह सोहळा उपायुक्त जे बी पाटील, मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. संदीप राठोड, जीएसटी उपायुक्त डॉ. रोहिणी धुमाळ, भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक सुनील थोरात, जेष्ठ पत्रकार शेखर पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करभाऊ काळे, नगरसेवक संजय आवटे, डॉ. पौर्णिमा किरण चौधरी, पुणे, डॉ. अबोली राहुल पाटील, मुंबई, डॉ. दीपक ठाकूर, जामनेर, डॉ. राजेश नाईक, जामनेर, सेलटॅक्स अधिकारी राहुल पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या विशेष विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी यश पांडे, डॉ. गणेश पाटील, नवरीचे मामा ज्ञानदीप पाटील आणि कॅन्सर तज्ञ डॉ. तुषार ईधाटे, नवरीचा भाऊ अर्णव गोपाळ पाटील आणि नवरदेवाचे भाऊ चेतन अशोक पाटील, प्रदीप दारकुंडे यांनी मेहनत घेतली.