ठराविक वृत्तवाहिन्यांकडून मुंबई पोलिसांविरोधात अपप्रचार

 

 

मुंबई,वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह मृत्यू गुन्ह्यात ठराविक वृत्तवाहिन्यांकडून मुंबई पोलिसांविरोधात अपप्रचार करून बदनामी केली जात आहे. सीबीआय, ईडी व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरू असलेल्या तपासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असा दावा करत आठ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘ पोलिस दलाची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने त्याला प्रतिबंध करावा’, अशी विनंती या अधिकाऱ्यांनी याचिकेत केली आहे.

राज्याचे माजी पोलिस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथुर व के. सुब्रमण्यम तसेच माजी मुंबई पोलिस आयुक्त डी. एन. जाधव व माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांचा याचिकादारांमध्ये समावेश आहे.

‘तपास सुरू असलेल्या गुन्ह्यात वार्तांकन संतुलित व वस्तुस्थितीदर्शक असायला हवे. कोणत्याही एका बाजूला न झुकता सचोटीने वार्तांकन होणे अभिप्रेत आहे. मात्र, काही ठराविक वृत्तवाहिन्यांकडून तसे होताना दिसत नाही. चुकीचे व हेतूपूर्वक वार्तांकन करून मुंबई पोलिस दलाला लक्ष्य करून या दलाची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. सुशांतसिंहबद्दल तपास सुरू असताना मीडिया ट्रायलही होताना दिसत आहे. याला चाप लावणारे निर्देश द्यावेत. वार्तांकनाच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना घालून द्याव्यात’, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
नीलेश नवलखा व अन्य दोन वकिलांनीही सुशांतसिंहच्या प्रकरणात सुरू असलेले मीडिया ट्रायल रोखावे, अशा विनंतीची एक जनहित याचिका केली आहे.

Protected Content