Home क्राईम चोपडा पोलिसांची तत्परता ; हरवलेला सहा वर्षांचा रुद्र दोन तासांत पालकांच्या स्वाधीन

चोपडा पोलिसांची तत्परता ; हरवलेला सहा वर्षांचा रुद्र दोन तासांत पालकांच्या स्वाधीन

0
10


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील गणेश कॉलनी परिसरातून हरवलेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा अवघ्या दोन तासांत शोध लावण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे रुद्र संदिप चौधरी हा सुखरूप आपल्या कुटुंबीयांच्या स्वाधीन झाला असून, पालकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चोपडा शहरातील गणेश कॉलनी येथील रहिवासी शोभाबाई कैलास चौधरी यांनी त्यांचा सहा वर्षांचा मुलगा रुद्र संदिप चौधरी हा दिसत नसल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना दिली. मुलगा कुठेतरी हरवला असल्याचे समजताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शोध मोहीम सुरू केली. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी त्वरित पथके रवाना करून हरवलेल्या रुद्रचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी चिमुकल्या रुद्रचा शोध घेण्यासाठी वेगाने हालचाली केल्या.

पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या दोन तासांच्या आत रुद्र संदिप चौधरी याचा शोध लावण्यात यश आले. पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव रुद्र संदिप चौधरी, वय ६ वर्षे असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तातडीने त्याची आजी शोभाबाई कैलास चौधरी यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि रुद्रला सुखरूप पालक, मामा व मामी यांच्या स्वाधीन केले. यावेळी रुद्रने खेळता खेळता रस्ता चुकल्याने तो हरवला होता आणि त्याला परत जाण्याचा मार्ग सापडत नव्हता, असे सांगितले. आपला चिमुकला सुखरूप परत मिळाल्याचे पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी चोपडा शहर पोलिसांच्या तत्परतेबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. पोलिसांच्या संवेदनशील आणि जलद कारवाईमुळे एका कुटुंबावर आलेले संकट टळले.


Protected Content

Play sound