Home आरोग्य डॉक्टर म्हणजे जीवनदान देणारे देवदूत -ॲड. राहुल पाटील

डॉक्टर म्हणजे जीवनदान देणारे देवदूत -ॲड. राहुल पाटील

0
10


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख ॲड. राहुल अशोक पाटील यांनी डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला सलाम करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. डॉक्टर हे समाजासाठी जीवनदान देणारे देवदूत असून त्यांची सेवा ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे त्यांनी आपल्या संदेशातून म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. या विशेष दिनानिमित्त ॲड. राहुल पाटील यांनी डॉक्टरांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. रुग्णांच्या वेदना कमी करून त्यांना नवजीवन देण्याचे अत्यंत पवित्र कार्य डॉक्टर करतात. आजारपणाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी डॉक्टर हे आशेचा किरण ठरतात. विशेषतः कोरोना महामारीसारख्या कठीण परिस्थितीत डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावली आणि लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या त्यागाची आणि समर्पणाची समाज कायम ऋणी राहील, असे ॲड. राहुल पाटील यांनी सांगितले.

डॉक्टर होण्यासाठी अनेक वर्षांचे कठोर शिक्षण, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रचंड मेहनत आणि सेवाभावाची आवश्यकता असते. सण-उत्सव, सुट्ट्या तसेच वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे समाजानेही डॉक्टरांचा योग्य सन्मान करावा, त्यांच्या उपचारांवर विश्वास ठेवावा आणि त्यांनी दिलेल्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या योगदानामुळे समाज अधिक सुरक्षित आणि निरोगी राहतो. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या सर्व डॉक्टर बंधू-भगिनींचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा देताना ॲड. राहुल पाटील यांनी “सेवा हीच खरी पूजा” हा संदेश दिला.


Protected Content

Play sound