फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्रांताधिकारी रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी कार्यभार असलेले वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडने देऊन या प्रकरणी कार्यवाहीची मागणी केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सध्या शैक्षणिक कामांसाठी विविध दाखल्यांची गरज पडत असल्यामुळे ठिकठिकाणच्या प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये विद्यार्थी व त्यांचे पालक चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे. हेच चित्र फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात दिसून येत आहे. मात्र येथे प्रांताधिकारी रजेवर असून त्यांनी दुसर्याकडे प्रभार दिलेला आहे. मात्र ज्यांच्याकडे प्रभार आहे ते देखील नियमीतपणे येत नसल्याने विद्यार्थी आणि पालक यांची कुचंबणा होत आहे.
या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकार्यांना आज निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या प्रकरणी विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेता कार्यभार असलेल्या अधिकार्यांनी नियमीतपणे येऊन दाखल्याचे वाटप करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे रावेर तालुकाध्यक्ष राजेंद्र कैलास चौधरी यांची स्वाक्षरी आहे.