रामसेतू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता काही तास उरले आहेत. यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ‘रामसेतु’ ज्याठिकाणी आहे, त्या ठिकाणाला भेट दिली. यानंतर त्यांनी धनुषकोडि येथील कोंदडारामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.
आज सकाळी दहाच्या सुमारास पंतप्रधान मोदी धनुषकोडि येथील अरिचल मुनाई येथे पोहोचले. याच ठिकाणापासून रामसेतू उभारण्यात आला होता, असं म्हटलं जातं. तर, धनुषकोडि येथे बिभीषण पहिल्यांदा श्रीरामाला भेटले होते, आणि त्यांना शरण आले होते. काही आख्यायिकांनुसार, याच ठिकाणी श्रीरामांनी बिभीषणाचा राज्याभिषेक केला होता.
याठिकाणी श्री कोदंडाराम स्वामींचं मंदीर आहे. कोदंडारामा शब्दाचा अर्थ धनुष्यधारी राम असा होतो. पंतप्रधान मोदींनी आज या मंदिरात दर्शन घेतलं, तसंच याठिकाणी त्यांनी विधिवत पूजादेखील केली.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी रामायण काळाशी संबंधित मंदिरांना भेट देत आहेत. शनिवारी त्यांनी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम येथे असणाऱ्या रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिली होती.