पंतप्रधान मोदींची चिडचिड समजून घेतली पाहिजे; शिवसेनेचा जोरदार पलटवार

uddhavthackeray modi

 

मुंबई (प्रतिनिधी) राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे, पण राममंदिर या विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपातच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे. बडबोलेपणामुळे पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर भाजप नेत्यांनी राममंदिरावर बोलणे टाळले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांची सूचना मान्य करून तोंडास कुलुपे घातली तर राममंदिराचा निर्णय लागलाच म्हणून समजा! पंतप्रधानांचीच तशी इच्छा आहे!’, असे म्हणत शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात राम मंदिर प्रकरणी केलेल्या वक्तव्याला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांना सर्वात जास्त त्रास त्यांच्याच पक्षातील बडबोल्यांपासून (वाचाळवीर) होत आहे. राममंदिराचा प्रश्न न्यायालयात असताना काही ‘बडबोले’ आणि ‘बयान बहाद्दर’ निरर्थक चर्चा घडवून आणत आहेत अशी टीका पंतप्रधानांनी केली व ती योग्यच आहे. आता हे बडबोले कोण? यावर ‘बयानबाजी’ सुरू झाली आहे. मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांना सगळ्यात जास्त त्रास स्वपक्षातील बडबोल्यांपासूनच होत आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तोंडास कुलूप लावावे असे मागे पंतप्रधानांना हात जोडून सांगावे लागले.

बडबोलेपणाची हद्द ओलांडली ती उत्तर प्रदेशातील भाजपचे एक मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांच्या टोकदार वक्तव्याने. भाजपच्या मुकुट बिहारींचे म्हणणे असे की, अयोध्येत राममंदिर होणार म्हणजे होणारच. कारण सुप्रीम कोर्ट आमचे आहे! देशाची न्यायव्यवस्था भाजपच्या मुठीत असल्याने राममंदिराचा निर्णय अनुकूलच लागेल. या बडबोलेपणाने सुप्रीम कोर्टही हादरले. मुख्य न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली व पंतप्रधान मोदींच्या ‘न्यायप्रिय’ भूमिकेवर विरोधक शंका उपस्थित करू लागले. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे,असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content