डेंग्यूच्या तापामुळे कोरोना आजारापासून बचाव !!

 

रिओ दि जनेरियो: वृत्तसंस्था । ब्राझीलमध्ये झालेल्या एका संशोधनात डेंग्यू आणि कोरोना विषाणूमध्ये संबंध आढळून आला आहे. डेंग्यूच्या तापामुळे कोरोना आजारापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे. डेंग्यूमुळे रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असून यामुळे कोरोनाच्या विषाणूंना अटकाव होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ड्यूक विद्यापीठाचे प्रा. मिगुइल निकोलेलिस यांनी २०१९ आणि २०२० या दोन वर्षातील डेंग्यूच्या तापासह कोरोना प्रसाराची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. ज्या भागामध्ये डेंग्यूच्या आजाराची मोठी साथ आली होती. त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात आढळला असून बाधितांची संख्याही कमी आहे.

ब्राझीलमध्ये झालेल्या संशोधनानुसार, ही आकडेवारी डेंग्यू विषाणू अॅण्टीबॉडी आणि कोरोना विषाणूमध्ये एक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेंग्यूच्या आजारासाठी देण्यात आलेली एक सुरक्षित लस, औषध हे कोरोनापासूनही काही प्रमाणात बचाव करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. डेंग्यू आणि कोरोना विषाणूमधील असा संबंध फक्त ब्राझीलच नव्हे तर दक्षिण अमेरिकेतील काही भाग, आशिया आणि पॅसिफिक महासागरातील देशांमध्ये आढळून आला आहे.

प्रा. मिगुइल निकोलेलिस यांनी सांगितले की, ही आकडेवारी खूपच महत्त्वपूर्ण आहे. ज्या व्यक्तींच्या रक्तात डेंग्यूच्या अॅण्टीबॉडी आहेत, त्या व्यक्तींच्या कोरोना अॅण्टीबॉडी चाचणी चुकीच्या पद्धतीने पॉझिटीव्ह येत आहे. त्यांना कोरोनाची बाधाही झाली नसताना त्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळत आहेत. या दोन्ही विषाणूंमध्ये काहीतरी संबंध असावा असेही त्यांनी म्हटले. प्रा. मिगुइल निकोलेलिस यांचे संशोधन लवकरत विज्ञानविषयक नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे.

ब्राझीलमध्ये बाधितांची संख्या वाढत असून ४५ लाखांवर आकडा पोहचला आहे. तर, मृतांती संख्या १ लाख ३७ हजार झाली आहे. भारतातही बाधितांची संख्या ५५ लाखांहून अधिक झाली आहे. तर, ८८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७० लाख जणांना बाधा झाली असून दोन लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content