गणेशोत्सवनिमित्त पुणे पथकांची जय्यत तयारी

Dhol Tasha

 

पुणे प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवे ताल आणि वादनातील वैविध्यासह ढोलताशा पथके सज्ज झाली आहेत. महिनाभरापासून शहराच्या विविध भागांमध्ये तालाचा लयबद्ध आविष्कारासह गणेशोत्सव आगळ्या पध्दतीने अनुभवता यावा, यासाठी पुणे पथकांची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू ! ढोलताशाच्या गजरात होणारे बाप्पाचे आगमन हा अभूतपूर्व सोहळा असतो. हा सोहळा अधिकाधिक देखणा करण्यासाठी ढोलताशा पथकांनी कंबर कसली आहे. शिस्त आणि तालबद्ध मिरवणुकीसाठी गणेश मंडळांची कायम ढोलताशा पथकांना पसंती असते. डीजेच्या दणदणाटात ढोलताशाचे लयबद्ध नादमाधुर्य सुखावह वाटते. गणरायाच्या आगमनासाठी ढोलताशा पथके गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तयारीला लागली आहेत. नदीपात्र, म्हात्रे पूल, विविध शाळांची मैदाने अशा विविध ठिकाणांहून सध्या ढोलताशांचा आवाज नागरिकांच्या कानावर पडत आहे.

ढोलताशा पथकात माहिती तंत्रज्ञान आणि इतर व्यवसायात कार्यरत असणारे युवकदेखील उत्साहाने सामील होत असतात. तीन-चार वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे. स्वत:च्या परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात सहभागी होण्याची ओढ असल्याकारणाने ही मंडळी पथकांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे शहरातील पथकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गणेशोत्सव काळात पथकांना साधारणपणे २ ते १० लाख रुपयांपर्यंत मानधन मिळते. 10 दिवसांच्या काळात साधारणपणे १० कोटींची उलाढाल होत असते. ढोलताशा महासंघाच्या मार्गदर्शनाखाली ढोलताशा पथकांची बैठकही नुकतीच पार पडली. पोलीस प्रशासनाबरोबरही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. पोलिसांनी तयार केलेल्या आचारसंहितेनुसार नियमावली तयार करण्यात आली आहे. या वेळी पोलिसांनी पथकांकडून सर्व वादकांची संगणकीकृत माहिती मागवली असून, पोलिसांकडून त्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत.

Protected Content