जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी पावसाळ्याच्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून, गुरुवार, २२ मे रोजी जळगाव पंचायत समिती येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती मिनल करनवाल यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाची पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली.
पावसाळ्यात उद्भवणारे पूर, वादळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचे प्रसंग टाळण्यासाठी तसेच तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात स्वयंसेवकांची एक विशेष टीम (आपत्ती मित्र) उभारण्यात येत आहे. या टीमच्या माध्यमातून जिल्ह्याभरात आपत्तीच्या काळात मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची एक मजबूत फळी तयार केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज जळगाव पंचायत समिती येथे हे महत्त्वाचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
श्रीमती करनवाल यांनी यावेळी प्रशिक्षणाची बारकाईने पाहणी केली. या टीममधील स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना कसे वाचवावे, प्रथमोपचार कसे करावेत, आणि मदतकार्यात प्रशासनाला कशी मदत करावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. संकटाच्या काळात नागरिकांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी ही टीम अत्यंत महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी जळगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी श्वेता पालवे देखील उपस्थित होत्या. प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकारामुळे आगामी पावसाळ्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास जिल्ह्याला अधिक सक्षमपणे मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.