महावितरणकडून मान्सूनपूर्व तयारी : वीज वितरण यंत्रणेची दुरुस्ती

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एप्रिलपासून विदर्भात उष्णतेचा पारा चढत असताना, महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, अवकाळी वादळे आणि मान्सून काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी सर्व परिमंडलात वीज वितरण यंत्रणेच्या देखभालीस वेग देण्यात आला आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर लोंबकळत असल्याने संभाव्य शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी झाडांची छाटणी केली जात आहे. तसेच, तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, तोरण, फ्लेक्स बोर्ड व प्लास्टिक झेंडे हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सैल गार्डिंग, तुटलेल्या किंवा लोंबत्या तारांचे दुरुस्ती काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.

वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर (रोहीत्र) व्यवस्थापनासाठी तेलाची पातळी तपासणे, सिलिका जेल बदलणे व अर्थिंग मजबूत करणे आदी कामे सुरू आहेत. पोल, वितरण पेट्या व फिडर पिलर्सचे अर्थिंग सुस्थितीत ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे.

महावितरणने नागरिकांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, वीजपुरवठा खंडित झाल्यास संयम बाळगावा, असे सांगण्यात आले आहे. ही सर्व कामे अखंडित, सुरक्षित आणि सुरळीत वीजसेवेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Protected Content