Home Cities रावेर सावदा येथील आ. गं. हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात ; नव्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व...

सावदा येथील आ. गं. हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात ; नव्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तकांनी स्वागत

0
26


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील श्री. आ. गं. हायस्कूल व श्री. ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात व्हावी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा, या उद्देशाने विद्यालयात प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करून त्यांच्या शिक्षण प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. दि. १५ जून २०२६ सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सावदा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री. विशाल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष तेली, विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. जी. भालेराव तसेच पर्यवेक्षक श्री. संजय मोतीराम महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी ए.पी.आय. विशाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण प्रक्रियेमध्ये शिस्त, सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आतापासूनच योग्य नियोजन करावे तसेच शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थिनींनी विशेषतः आपल्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, समाजात वावरताना आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. संकटाच्या वेळी मदतीसाठी ११२ या आपत्कालीन क्रमांकाचा वापर करावा. या क्रमांकावर संपर्क साधल्यास पोलीस मदतीसाठी तत्काळ उपलब्ध होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुविधेची माहिती ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, शिस्त आणि जबाबदारीची भावना जोपासण्याचा संदेश देण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी आपली ध्येये निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले तर त्यांनीच आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound