
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवे शैक्षणिक वर्ष, नवा वर्ग आणि नव्या पुस्तकांचा सुवास अशा अत्यंत उत्साही वातावरणात दि. १५ जून रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, रायपूर येथे शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस ‘शाळा प्रवेशोत्सव’ म्हणून मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘शाळा प्रवेशाचे पहिले पाऊल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. निलेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रलेखा वायकोळे, रायपूर गावच्या सरपंच रजनी सपकाळे, उपसरपंच संगीता कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण परदेशी व पुष्पाबाई परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची मिरवणूक आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांना आकर्षक पद्धतीने सजवलेल्या गाडीतून मिरवणुकीने वाजतगाजत शाळेत आणण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच, यावेळी लहान मुलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या विविध खेळांच्या दालनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणाधिकार्यांनी नव्या विद्यार्थ्यांसोबत ‘सेल्फी’ काढून त्यांचा उत्साह वाढवला.
गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव आणि पर्यावरण संदेश
मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणारी शाळेची गुणवंत विद्यार्थिनी संजीवनी गजानन पाटील हिची ‘एन.एम.एम.एस.’ (NMMS) परीक्षेसाठी निवड झाली आहे. तिला इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यान दरवर्षी १५,००० रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाल्याबद्दल शिक्षणाधिकार्यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
पर्यावरणाचा संदेश: पहिल्याच दिवशी निसर्गाचे ऋण जपण्यासाठी मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप
जळगाव शहराच्या जवळ असूनही या शाळेने राखलेली गुणवत्ता आणि जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या टिकवून ठेवल्याबद्दल शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी मॅडम यांनी संपूर्ण शाळेचे कौतुक केले. शाळेच्या एकूणच शिस्तबद्ध वातावरणावर त्यांनी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रमोदिनी सनेर यांनी केले, तर प्रास्ताविक ज्योत्स्ना साळुंखे यांनी मांडून उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.



