परमात्म्याच्या मार्गावर एकट्यानेच जावं लागेल – स्वामी श्रवणानंद सरस्वती महाराज

aradhana news

जळगाव, प्रतिनिधी । तुम्ही सर्व मिळून साधना करा. जसे आपण सर्व मिळून कथा ऐकतोय. परंतु जर परमात्म्याकडे जायचं असेल तर हा मेळा नाही चालणार. एकट्यानेच जावं लागेल. गोपिकांनी कात्यायिनीची आराधना सर्व मिळून केली होती परंतु जेव्हा त्यांनी ऐकले गोविंद बोलवताय् तेव्हा त्यांनी कुणालाही सांगितले नाही. असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले.

पुढे बोलतांना सांगितले की, परमात्म्याकडे जाण्याच्या मार्गावर निघालेल्यांना एकट्यानेच जावे लागेल. आपण पाहतो काही लोक जिवनातील सर्व उर्जा इतरांना पुढे चालण्यातच घालवतात. ज्याला आत्मकल्याण करायचं असेल ते स्वतःलाच करावे लागेल, असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले. शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजित 21 दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सवाच्या पंधराव्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, जो तुम्हाला आनंद देतोय् त्यामुळे तुम्हाला दुःख देखील मिळण्याची शक्यता असते. एखादा पदार्थ खूप आवडतो म्हणून जास्त खाल्ला तर नंतर पोट खराब झाल्याने झोपूही शकत नाही. त्याला मिळविण्यासाठी जेवढा वेळ खर्च केला त्यापेक्षा जास्त वेळ त्रास भोगण्यात जाईल. एखाद्या व्यक्तीला मिळविल्यानंतर तुम्ही खूप प्रसन्नित होत असाल आणि नंतर तुमचं त्याच्यासोबत जमलं नाही तर असं वाटते हा केव्हा आपल्यापासून दूर जाईल. संसारातील सर्व सुख केवळ विषय सुख आहेत रास सुख नव्हे, असे स्वामीजींनी सांगितले.

स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी पुढे सांगितले की, जो गुरूजनांच्या अधिक जवळ असतो तो खाली राहून जातो आणि जो गुरूजनांपासून लांब असतो ते सर्व मिळवून घेतात. यात आपलीच कमतरता असते. आपण ते नाही पाहत जे समोर आहे आपण ते पाहतो जे आपल्या हृदयात आहे. आपण जर लोभी आहोत तर असं वाटेल आपले गुरू देखील लोभी आहेत. जवळ राहिल्याने सर्व भेटत नाही. ज्यांना पुर्णतेची प्राप्ती करायची असेल त्यांच्यासाठी देवाने पर्याय सांगितले आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण सांगतात माझी कथा ऐकायला हवी. श्रवणाने देवाची प्राप्ती होते. दुसरा उपाय सांगितला मी गोचरण करून आल्यानंतर माझे दर्शन करावे. तिसरा उपाय सांगितला एकट्याने साधना करायला हवी, असे स्वामीजींनी उदाहरणासह सांगितले.

स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, स्वतःचे, मोठ्या मुलाचे आणि गुरूचे नाव पुन्हा-पुन्हा घ्यायला नको. नवर्‍याचे देखील नाव घ्यायला नको. वारंवार पतीचे नाव घेतल्याने त्याचे आयुष्य कमी होते. नाव पुन्हा पुन्हा घ्यायला नको म्हणून उपनाव ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे, असे स्वामीजींनी निरूपण करताना सांगितले.

भगवान श्रीकृष्णांसह दिसल्या गोपिका
श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा महोत्सवात पंधराव्या दिवशी एका सत्रात भगवान श्रीकृष्ण आणि गोपिका तर दुसर्‍या सत्रात महारासची सजीव आरास साकारण्यात आली.

Protected Content