जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्यात जंगल आणि शेतशिवारात शेतीची राखण करणाऱ्या गरजू शेतकरी, शेतमजूर व रखवालदारांना दिलासा देण्यासाठी प्रचिती फाउंडेशन, जळगावच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गाडेगाव जंगल व शेतशिवार परिसरातील गरजू बांधवांना फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल १०० रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.
पावसाळ्याच्या काळात शेतांची राखण करताना शेतकरी, शेतमजूर आणि रखवालदारांना अनेक तास पावसात राहावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांकडे पावसापासून संरक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध नसतात. ही गरज लक्षात घेऊन प्रचिती फाउंडेशनने थेट गरजूंपर्यंत पोहोचत रेनकोटचे वितरण केले. या मदतीमुळे पावसाळ्यातील दैनंदिन कामे अधिक सुरक्षित आणि सुलभपणे करता येणार असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रचिती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन घुगे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या सहकार्याने रेनकोटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी फाउंडेशनचे अशोक घुगे, पूजा घुगे, संजय घुगे, गौरव पाटील, रोशन वाघ, सुनंदा घुगे यांच्यासह प्रचिती मीडियाचे अक्षय लोडते, राम बोरसे, तेजस वर्दे, नितीन वाघ, जयेश पाटील तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी समाजातील गरजू घटकांच्या अडचणी समजून घेऊन प्रत्येकाने आपल्या परीने सामाजिक कार्यात योगदान देण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना प्रत्यक्ष उपयोगी पडतील, अशा लोकाभिमुख उपक्रमांना भविष्यातही सातत्याने प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रचिती फाउंडेशनकडून गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती तसेच विविध लोकहिताच्या क्षेत्रांत उपक्रम राबविले जात आहेत. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा असल्याची भूमिका ठेवून फाउंडेशनकडून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



