
बुशहर (वृत्तसंस्था) इराणच्या बुशहर शहरात आज सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.५० वाजता शक्तीशाली भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची ४.९ इतकी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे इराणच्या अणुऊर्जा केंद्राजवळच हा भूकंप झाला आहे.
इराणच्या बोराझजान शहरापासून आग्नेय दिशेला १० किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. एवढ्याच तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के डिसेंबर महिन्यातही इथे बसले होते. आजचे जाणवलेले धक्के हे नैसर्गिकरित्या आलेल्या भूंकपाचेच धक्के असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे बुधवारी सकाळी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर काही क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.