लोकसंख्या स्फोटाने भारत भविष्यात गोत्यात येणार !

population 2

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या लोकसंख्येत गेल्या नऊ वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आले आहे. २०१० ते २०१९ या कालावधीत प्रत्येकवर्षी भारताची लोकसंख्या १.२ टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीतून निदर्शनास आले आहे. नजीकच्या भविष्यात यामुळे भारतापुढे प्राथमिक गरजांच्या पुर्तीसाठीचे प्रचंड मोठे संकट उभे राहणार आहे. भारताच्या तुलनेत जागतिक लोकसंख्येत १.१ टक्क्यांनी वाढ होते आहे. भारताची लोकसंख्या वाढीची टक्केवारी चीनपेक्षा दुप्पट असल्याचं दिसून आले आहे. २०१०-१९ या कालावधीत चीनची लोकसंख्या प्रत्येकीवर्षी ०.५ टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

 

संयुक्त राष्ट्र जनसंख्येचा ‘स्टेट ऑफ वर्ल़्ड पॉप्युलेशन २०१८’ चा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार जागतिक लोकसंख्येचा आकडा २०१९ मध्ये ७७१.५ करोडपर्यंत वाढला आहे. मागील वर्षी हाच आकडा ७६३.३ करोड होता. सध्या माणसाचे सरासरी आयुष्यमान ७२ वर्षे आहे. अल्प विकसित देशांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येते. आफ्रीका खंडातील देशांमध्ये प्रत्येकवर्षी २.७ टक्क्यांनी लोकसंख्या वाढत आहे. यूएनएफपीए या संस्थेची स्थापना होऊन ५० वर्षे पूर्ण झाली. लोकसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने जगातील देशांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली होती. २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढीमध्ये आफ्रिकी देश आणि भारत, नायजेरियासारख्या देशांचा समावेश असणार आहे. भारताच्या २४ राज्यांमध्ये प्रति महिला २.१ प्रजनन दर आहे. मात्र भविष्यासाठी ते धोकादायक ठरणारे आहे.

भारताची वाढती लोकसंख्या भविष्यात देशासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्था यासाठी भारताने सज्ज राहायला हवे. कारण वाढत्या लोकसंख्येसोबत या समस्यांना भारताला तोंड द्यावे लागेल, असा इशारा यूनएनएफपीए इंडियाचे अधिकारी चार्ज क्लॉस बैक यांनी दिला आहे.

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी भारताला इतर देशांकडून शिकावे लागेल. सर्वात गरिब अशा २० टक्के घरांमध्ये गर्भनिरोधक आणि आरोग्य सेवांची गरज आहे. चीनने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भारताने देखील योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे निवारा, अन्नाचा तुटवडा, मुलभूत सुविधांचा अभाव, अशी अनेक संकटे भारतासमोर भविष्यात उभी राहणार आहेत.

Add Comment

Protected Content