‘रीनैसंस द स्टेट’ पुस्तकावर बंदी लावण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । पत्रकार गिरीष कुबेर यांच्या ‘रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आज मंगळवारी दुपारी निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गिरीष कुबेर या लेखकाने  ‘रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणे हा जाणीवपुर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्रहनन करण्याचा काम अश्या कथा, कादंबरी, मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे. या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होवू शकतो, लेखक कुबरे यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासीयांना मान शरमेने खाली जाईल असेच आहेत. या पुस्तकावर तत्काळ बंदी आणावी, राज्यात वितरण केलेले सर्व पुस्तके शासनदरबारी जमा करावी. कुबेर यांच्या बदनामीकारक लेखण केल्याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या निवेदनावर अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा वंदना पाटील, भारती राजपूत, जयश्री पाटील, विद्या वाणी, रेखा पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content