यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसा येथील संघर्षशील सामाजिक कार्यकर्त्या पुनम मनोज पाटील यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी स्वाक्षरीत नियुक्ती पत्राद्वारे ही घोषणा केली. या नवीन जबाबदारीमुळे पुनम पाटील उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी चळवळ अधिक मजबूत करतील आणि नागरिकांच्या समस्यांसाठी प्रभावीपणे आवाज उठवतील, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
पुनम पाटील या यापूर्वीपासूनच समाजातील दुर्बळ घटकांसाठी कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. पाडळसे गावासह संपूर्ण यावल तालुक्यातून पुनम पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या या यशाचे स्वागत केले असून, भविष्यातील सामाजिक लढ्यांमध्ये त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना पुनम पाटील म्हणाल्या, “सत्याच्या आणि पारदर्शक व्यवस्थेच्या स्थापनेसाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन.” त्यांच्या या भूमिकेमुळे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यात अधिक प्रभावीपणे योगदान देण्याची त्यांची कटिबद्धता दिसून येते.