यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तहसील कार्यालयात रेशनकार्ड मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना दलालांमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मोफत मिळणारे रेशनकार्ड मिळवण्यासाठी दोन-दोन हजार रुपये घेतले जात आहेत. तसेच, स्वस्त धान्य दुकानदार वितरणासाठी मिळालेल्या धान्यापैकी निम्मे अधिक धान्य साठवून काळ्या बाजारात विकत असल्याच्या गंभीर तक्रारी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या आढावा बैठकीत मांडल्या.
यावल पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत आमदार सोनवणे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना तहसीलच्या पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “रेशनकार्ड लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. गरीब लोकांच्या हक्काचे पिवळे रेशनकार्ड अनेक श्रीमंत लोकांकडे आहेत. त्यांची तातडीने चौकशी करून ती रद्द करावीत. तसेच, रेशनकार्ड मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात दलालांमार्फत होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी.”
आमदार सोनवणे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या काळ्या बाजारावरही गंभीर आरोप केले. त्यांनी नुकतेच रुजू झालेले तालुका पुरवठा अधिकारी अभिमन्यु चराटे यांना या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, “स्वस्त धान्य दुकानदार वितरणासाठी मिळालेल्या धान्यापैकी अर्ध्याहून अधिक धान्य साठवून काळ्या बाजारात विकत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”
या आढावा बैठकीला तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार सोनवणे यांनी मांडलेल्या गंभीर आरोपांमुळे यावल तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तालुका पुरवठा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.