दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ही रिट याचिका पूजाच्या वतीने यूपीएससीची उमेदवारी रद्द करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे. तसेच ज्या संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती त्या सर्व संस्थांना रिट याचिकेत पक्षकार करण्यात आले आहे. डीओपीटी, यूपीएससी, लबसाना, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या सर्वांनी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे पूजा खेडकर यांनी या सर्वांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.
पटियाळा हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरला उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून केलेली निवड रद्द केली होती. याशिवाय भविष्यात आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससीने पूजाला अनेक वेळा बनावट ओळख वापरून परीक्षेत बसल्याबद्दल दोषी ठरवले आहे. यूपीएससीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, खेडकर या नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्या आहेत.