जळगावात एकच चर्चा…नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर बेभान नाचणारा ‘तो’ लोकप्रतिनिधी कोण ?

जळगाव प्रतिनिधी । लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर रेल्वेच्या डब्यात बेभान नाचणारा ‘तो’ लोकप्रतिनिधी कोण ? ही चर्चा आता जळगाव लोकसभा मतदारसंघात कळीचा मुद्दा बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव शहरासह या मतदारसंघातील प्रत्येक गावात याबाबत चर्चा रंगली आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्री बनणार असल्याची चर्चा होती. यामुळे जिल्ह्यातून भाजपला जोरदार यश मिळाले होते. मात्र निकाल लागताच पक्षाने अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. मात्र नाराज नाथाभाऊंना महसूलसह तब्बल १२ खाती देण्यात आली. त्यांनी अतिशय धडाकेबाज पध्दतीत काम सुरू केले असतांना अचानक त्यांच्यावर विविध आरोपांची सरबत्ती करण्यात आली अन् त्यांना राजीनामा द्यावा लागला. या सर्व कारस्थानांमध्ये काही स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय खुद्द नाथाभाऊंनीही अनेकदा व्यक्त केला आहे. यातून घरभेद्यांमुळेच खडसे यांचा घात झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या कालखंडात एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी रेल्वेच्या प्रथमवर्गाच्या डब्यात (एसी फर्स्ट क्लास) अगदी बेभान होऊन नाचला होता. याची चर्चा राज्य पातळीवर झाली होती. तर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटले होते. एखाद्याचा व्यक्तीद्वेष हा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो याचे हे उदाहरण मानले गेले होते. म्हणजेच ‘खडसे हटाव’ मोहिमेच्या कुभांडात या लोकप्रतिनिधीचा हात तर नव्हे ना? अशी चर्चादेखील रंगली होती. मात्र जीवन हे वर्तुळ असल्याचे मानले जाते. अनेकदा घटनांची पुनरावृत्ती होतांना परिस्थिती अगदी भिन्न झालेली असते. नेमके हेच आता घडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच नाचणारा लोकप्रतिनिधी आता मदतीच्या अपेक्षेने लोकांकडे जात असतांना जनतेला त्या घटनेची आठवण होऊ लागली आहे.

एकनाथराव खडसे हे जाती-धर्माच्या पलीकडचे महनीय व्यक्तीमत्व आहे. अठरापगड समाज सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असणार्‍या या लोकनेत्याचा घात झाला असतांना विकृत आनंदोत्सव साजरा करणार्‍या त्या लोकप्रतिनिधीविषयी आता सर्व समाजांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जो नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ आणि आदरणीय नेत्याला झाला नाही तो सर्वसामान्यांना होणार का ? असे प्रश्‍न आता विचारले जात आहेत. यातून अनेक ठिकाणी प्रक्षुब्ध चर्चादेखील झडत आहेत. अर्थात, आगामी निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा बनण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

5 Comments

  1. Dr.Ramesh Rangrao patil.
  2. Vaibhav Patil
  3. Anonymous
  4. Anonymous
  5. दिलीप जैन

Add Comment

Protected Content