वृक्षतोड प्रकरणात बाजार समितीसह कारागृह प्रशासनावर कारवाईची शक्यता ?

 

जळगाव,प्रतिनधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने वृक्षतोडीप्रकरणी दंड न भरल्याने सभापतींवर गुन्हा दाखल करणे तसेच जिल्हा कारागृह प्रशासनाने बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक अथवा कुठली कार्यवाही करावी याबाबतचे सविस्तर निर्णय महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये मंगळवार १ डिसेंबर रोजी घेतला जाणार आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक १३ व्या मजल्यावर १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.  सुमारे २ वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीने मनपाच्या हद्दीत येणारी १२६ झाडे तोडल्याप्रकरणी त्यांना १२ लाख ६० हजार रुपये दंड झाला होता. मात्र त्यांनी तो भरला नाही. त्यामुळे आजच्या तारखेला हा दंड आता १६ लाख रुपये झाला आहे. याविषयीची फाईल आयुक्तांच्या टेबलावर आलेली असून आता त्यांना, दंड भरा अन्यथा गुन्हा दाखल करू अशी नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर थेट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करावी याविषयी निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीत निर्णय घेण्यात येणार आहे.

तसेच जिल्हा कारागृह प्रशासनाने विनापरवानगी झाडे तोडल्याप्रकरणी त्यांना दंड लावण्याविषयी निर्णय होणार असून त्याबाबत तक्रारी देखील वरिष्ठ पातळीवर झालेल्या आहेत. त्यावर महापालिकेतर्फे कुठलीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनावर कारवाई करण्याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे. याविषयी शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे कारागृह प्रशासनाला देखील दंड लावा अन्यथा कारवाई करा अशी मागणी केली जाणार आहे. याशिवाय विविध संस्था व नागरिकांचे सुमारे ५० पेक्षा जास्त वृक्षतोड व फांदी तोडण्याचे प्रस्ताव मनपा प्रशासनाला प्राप्त असून त्यावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

Protected Content