करकरेंविरोधात वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाकडे साध्वीविरोधात तक्रार

karkare pragya

 

भोपाळ (वृत्तसंस्था) मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएस असोसिएशननेही साध्वीच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

 

‘हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले होते. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळे झाला आहे,’ असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंहने केले होते. त्यावर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २६/११च्या हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याची तक्रार आमच्याकडे आली असून त्याविषयी अधिक तपास सुरू आहे, असे मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे साध्वी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे आयपीएस असोसिएशननेही साध्वीच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. करकरे यांना त्यांच्या बलिदानाबद्दल अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र साध्वीने त्यांच्यावर टीका करून शहिदांचा अवमान केला आहे, असे ट्विट आयपीएस असोसिएशनने केले आहे.

Add Comment

Protected Content