चोपडा, प्रतिनिधी | महाराष्ट्रात विकासाचा विजय होत असतांना ना युती हरली ना आघाडी… हारला तो फक्त आमचा शेतकरी. ज्याचे हाता- तोंडाशी आलेले पिक शेतात भिजत पडलेय आणि तो आभाळाकडे तोंड करुन रडतोय. असा आरोप येथील मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ टी. बाविस्कर यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, याच कारणांमुळे शेतकरी आत्महत्त्या करीत असतात. मरण्यासाठी लाख रुपये देण्यापेक्षा, जगण्यासाठी शेतमालाला हमी भाव, खते,बियाणे व किटकनाशके यांच्या वाजवी किमती, कमी व्याजी कर्ज, सरसकट कर्जमाफी व संपुर्ण विज बिलमाफी तसेच इतर सोयी दिल्या तर नक्कीच आमचा शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तर देश जगेल. आज त्याला कोणी वाली नाही. राजकीय पक्ष सत्ता स्थापनेत मशगुल आहेत. शासन व प्रशासन हतबल असल्याचे दिसत आहे. अशात फक्त प्रसार माध्यमे आपापल्या परिने शेतीच्या नुकसानीबाबत लिहिण्याचा, छापण्याचा, सांगण्याचा व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दिसत आहेत. आपल्या क्रुषिप्रधान देशातील शेतकरी जगला पाहिजे, कारण तोच ह्या जगाचा पोशिंदा आहे . तोच थांबला, संपला तर संपुर्ण जगच संपेल. असेही मत श्री. बाविस्कर यांनी या पत्रकातून व्यक्त केले आहे.