Home Uncategorized ऑल आऊट ऑपरेशन’ मोहिमेत पोलिसांची धडक कारवाई; सव्वा दोन लाखांचा दंड वसूल.

ऑल आऊट ऑपरेशन’ मोहिमेत पोलिसांची धडक कारवाई; सव्वा दोन लाखांचा दंड वसूल.


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ ही विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत जिल्ह्यात अचानकपणे मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्याभरात एकूण ३६ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले होते. या कारवाईत ५१ अधिकारी आणि २७२ अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पोलिसांनी एकूण १५२५ वाहनांची तपासणी केली असून, त्यापैकी ३४२ लहान-मोठ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून २ लाख ३८ हजार ८०९ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

या मोहिमेदरम्यान, गांजा पिणाऱ्या एकूण २८ इसमांवर NDPS कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच, सराईत गुन्हेगारांकडून अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६ गुन्हे दाखल करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या १४ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर अवैध दारू विक्री करणाऱ्या ९६ व्यक्तींवर आणि अवैधपणे सट्टा (जुगार) चालवणाऱ्या ४८ व्यक्तींवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

याशिवाय, जिल्ह्याभरातील १७६ हॉटेल आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली. २८ हद्दपार आरोपींची तपासणी केली असता, त्यापैकी २ हद्दपार आरोपी घरीच मिळून आल्याने त्यांच्यावर बीपी ॲक्ट १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच, ८५ हिस्ट्रिशीटर आणि ११६ एनबीडब्ल्यू (Non Bailable Warrant) वॉरंटमधील आरोपी, तसेच ६४ फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची तपासणी करण्यात आली असून, मिळून आलेल्या आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. सदरची सर्व कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Protected Content

Play sound