Home आरोग्य तापमानाचा पारा चढला; उष्माघात रुग्णांसाठी महादेव हॉस्पिटल सज्ज

तापमानाचा पारा चढला; उष्माघात रुग्णांसाठी महादेव हॉस्पिटल सज्ज


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महादेव हॉस्पिटलमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव ठेवण्यात आला असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हॉस्पिटल प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात मोठी वाढ होत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू शकतो. प्रचंड डोकेदुखी, चक्कर येणे, शरीरात अशक्तपणा जाणवणे, उलट्या किंवा मळमळ होणे, शरीराचे तापमान अचानक वाढणे तसेच काही वेळा शुद्ध हरपणे किंवा बेशुद्ध पडणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे मानली जातात. अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन जळगाव येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तात्काळ तपासणी आणि उपचारासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे अनुभवी डॉक्टरांची टीम तैनात असून अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्रीसह रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे असल्याचेही हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे. शक्यतो दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलका व पचायला सोपा आहार घेणे तसेच शरीरातील पाण्याची कमतरता होऊ न देणे या बाबींची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्माघाताचा त्रास जाणवल्यास नागरिकांनी तातडीने हेल्पलाईन क्रमांक ९११२०३००५५, ९११२०४००५५ किंवा ९३२५१५०००४ वर संपर्क साधावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेत वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

 


Protected Content

Play sound