Home क्राईम हातेड शिवारात पोलिसांचा छापा; ७ किलोहून अधिक गांजासह तिघांना अटक

हातेड शिवारात पोलिसांचा छापा; ७ किलोहून अधिक गांजासह तिघांना अटक

0
97

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गांजासह कार, मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण ₹६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने २६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजेच्या सुमारास लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावर पाटचारीजवळ हातेड शिवारात संशयास्पद वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ७७ हजार ९०० रुपये किमतीचा ७ किलो ११६ ग्रॅम गांजा, ₹३ लाख किमतीची हुंडाई सॅन्ट्रो कार, ₹९० हजार किमतीची पल्सर मोटारसायकल तसेच ₹४१ हजार किमतीचे विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन असा एकूण ₹६ लाख ८ हजार ९०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ मधील कलम २०(ब) व २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस सातत्याने विशेष मोहीम राबवत आहेत. अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात भविष्यातही अधिक प्रभावी कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चोपडा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहिते, पॉका किरण पारधी, गजानन पाटील, चेतन महाजन, निलेश पाटील, प्रमोद पवार, विनोद पवार , आत्माराम अहिरे यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound