जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामनगरात सट्टा जुगार खेळविणार्‍या तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून २ हजार ४९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामनगर परिसरात सट्टा जुगार खेळविणार्‍यांसह खेळणार्‍यांवर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. याठिकाणाहून पळून जात असतांना रंगनाथ  रमेश वाणी (वय-४३, रा. रामेश्वर कॉलनी), किशोर बळीराम सपकाळे (वय-४४, रा. गौतम नगर तांबापूर), शेख मुनीर शेख बशीर (वय-६४, रा. इंद्रप्रस्थनगर, सुप्रिम कॉलनी) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांची चौकशी केली असता त्यांनी कदीरोद्दीन शेख याच्या सांगण्यावरुन आम्ही सट्टा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून २ हजार ४९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content