खामखेडा येथील महिलेच्या मृत्यू प्रकरणात पोलीसांची निष्काळजीपणा- आनंद बाविस्कर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील खामखेडा येथे मावस भावाकडे लग्नासाठी आलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यात पोलीसांची निष्काळजीपणा दिसून येत असून पोलीस अधिक्षकांना ई-मेलद्वारे मिसींग झाल्याची माहिती वेळेत दिली गेली असती तर महिलेचा जीव वाचला असता असा आरोप निळे निशानचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील विटवा येथील ज्योती विलास लहासे (वय-३१) असे मयत महिलेचे नाव आहे. सदरील महिला ही २८ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर तालुकयातील खामखेडा येथील मावस भावाकडे लग्नाच्या निमित्ताने आली होती. दरम्यान २८ डिसेंबर रोजी शौचास जावून येते असे सांगून घरातून निघालेल्या ज्योती लहासे ह्या सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाही. म्हणून नातेवाईकांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. यात पोलीसांनी महिला मिसींग झाल्याबाबत पोलीस अधिक्षकांना ईमेलद्वारे कळविले नाही किंवा महिलेच्या शोधासाठी कोणत्याही हलचाली केल्या नाही. ३१ डिसेंबर रोजी ज्योती लहासे यांचा मृतदेह खामखेडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सुकडी वनविभागाच्या ४४१/४४२ हद्दीत असलेल्या एका नाल्याच्या पाण्याच्या ठिकाणी आढळून आला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महिलेचा मृत्यू संशयास्पद झाल्याने दिसून येत होते. मुक्ताईनगर पोलीसात अगोदर मिसींगची नोंद केली असतांना तपासाधिकारी पोहेकॉ संदीप खंडारे यांनी कोणताही तपास केला नाही. पोलीस अधिक्षक कार्यालयात तसा मेल केला असता तर महिलेच्या मोबाईल लोकेशनद्वारे तिचा तपास करून तिचा जीव वाचविला असता असा आरोप निळे निशानचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी अयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

 

पोहेकॉ खंडारे यांच्या केवळ निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे सदर महिलेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा हा कायम करण्यात येतो. विशेषतः त्यामध्ये जर गुन्हा मीसिंगचा असेल तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे

Protected Content