बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात 19 मार्च रोजी होणाऱ्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी त्यांना 16 मार्च रोजी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आंदोलन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या नोटीसला घाबरण्याची गरज नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारच, असे ठाम मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीन-कापूस भावफरक यासह ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकांना मदत व भाववाढ यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली जाणार आहे तसेच सोयाबीन व कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे. 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलढाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटरवरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी मुंबईकडे रवाना होणार आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना भारतीय दंड संहिता कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलन टाळावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद आहे.मात्र, रविकांत तुपकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमच्या घरातील कपाट अशा नोटिसांनी भरले आहे. आम्ही कोणत्याही नोटीसीला घाबरत नाही. सरकार आणि प्रशासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आम्ही डगमगणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत.”