जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील एका गावात असलेल्या मुलींच्या वसतीगृहात पाच अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात काळजी वाहक आणि वसतीगृह अधिक्षक यांना अटक करण्यात आली होती. गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती एस. एन. राजूरकर यांनी अटकेतील संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एरंडोल तालुक्यातील एका गावात शासन मान्य असलेली आदीवासी मुलींचे वसतीगृह आहे. या ठिकाणी काही आदिवासी अल्पवयीन मुली वास्तव्याला होत्या. ऑगस्ट २०२२ ते जुन २०२३ पर्यंतच्या काळात वसतीगृहात पाच अल्पवयीन मुलींवर काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत (वय-३१), अधिक्षिका अरूणा गणेश पंडीत (वय-२९) आणि सचिव भिवाजी दिपचंद पाटील यांनी लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात गणेश पंडीत आणि अरूणा पंडीत यांना अटक करण्यात आली होती. गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायमुर्ती एस.एन. राजुरकर यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.