जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे शेतकऱ्यांचा सण पोळानिमित्त बैलांच्या पूजनासह शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सजीव आरास करून परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून विद्यालयात शेतकऱ्यांना बोलावून पोळा सण साजरा करण्याची संकल्पना यावर्षी संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी परिसरातील शेतकरी दिलीप रडे यांना बोलावुन पूर्ण केली. शाळेच्या पटांगणात बैलांना सजविण्यात आले. प्रसंगी मुकेश नाईक व स्वाती नाईक यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून शेतकऱ्यास कपडे, श्रीफळ देऊन हृदय सन्मान करण्यात आला.
यावेळी भगवान शंकर व नंदीचा सजीव देखावा उभारण्यात आला होता. शंकराच्या अवतारात इयत्ता चौथीचा कविराज जगदीश पाटील याने लक्ष वेधून घेतले. सकाळी मेहरूण परिसरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग घेतला.
मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी बैलांचे व शेतीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी इयत्ता पहिलीची कावेरी जगदीश पाटील हिने देखील पोळा सणाविषयी माहिती सांगितली. असे उत्सव शाळांमधून जाणीवपूर्वक साजरे केले पाहिजेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती-परंपरा माहीत होतात. त्या मागची संकल्पना, उद्देश स्पष्ट होतो आणि त्यातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण, एकात्मता साधली जाते व पुढची एक सक्षम पिढी निर्माण होते. म्हणून सर्वच शाळांमधून मराठमोळे सण-उत्सव साजरे करून आपली भाषा, आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे, असे संस्थेचे सचिव तथा उप शिक्षक यांनी सांगितले.
प्रसंगी उपशिक्षिका आम्रपाली शिरसाट,साक्षी जोगी, दिव्या पाटील, सोनाली जाधव, सोनाली चौधरी,पुनम निकम, कोमल पाटील, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे आदींनी सहकार्य केले.