मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील पीएमसी बँकेत कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला बॅंकेचा व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाममध्ये धर्मांतर केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. याचबरोबर थॉमसच्या सचिवाच्या नावावर पुण्यात तब्बल नऊ फ्लॅट असून या फ्लॅट्सची किंमत ४ कोटी रुपये असल्याचे पोलीस तपासात आढळून आलेय.
६२ वर्षीय जॉय थॉमस हा पूर्वीपासून विवाहित होता. नंतर कार्यालयात त्याचे खासगी सचिव तरुणीशी संबंध जुळले. आपण लग्न करून दुबईला स्थायिक होत असल्याचे कारण देत या तरुणीने २००५ साली पीएमसी बँकेचा राजीनामा दिला होता, अशी माहिती बँकेतील तिच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, ती मुंबईहून पुण्यात स्थायिक झाली. जॉय थॉमस याने धर्मांतर करून जुनेद असे नवे नाव धारण करून खासगी सचिवासोबत लग्न केले. लग्नानंतर जॉय मुंबईहून सतत पुण्याला जात-येत होता. थॉमस आणि त्याच्या या दुसऱ्या पत्नीला एक ११ वर्षांची दत्तक मुलगी तसेच एक मुलगा आहे. थॉमसची ही दुसरी पत्नी पुण्यात चॉकलेटचे उत्पादन आणि विक्री करते, शिवाय तिच्या मालकीचे एक बुटिक असून पुण्यातील इतर फ्लॅट्सच्या भाड्यातून ती अर्थार्जन करते. तिच्या नावावर पुण्यात एवढे फ्लॅट कसे, याचा तपास पोलीस करत असून घोटाळ्यातील पैशांमधून हे फ्लॅट विकत घेतल्याचे आढळून आल्यास ते जप्त करण्यात येतील असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, जुनेद हे आपले बदललेले नाव असले तरी या नावाने आपण कोणताही आर्थिक व्यवहार केला नसल्याचे थॉमसने पोलिसांना सांगितले. लग्न करण्याच्या सोईसाठी त्याने हे धर्मातर केले असल्याचे दिसून येते. पोलिसांनी थॉमस याच्या नावावर असलेले मुंबई आणि ठाण्यातील चार फ्लॅट यापूर्वीच जप्त केले आहेत. यातील एका फ्लॅटची नोंदणी ही थॉमसच्या पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावावर असल्याचे आढळले आहे. थॉमसने दुसरे लग्न केल्याचे कळल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.