पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसदेचे लोकार्पण : राजदंड ‘सेंगोल’ची स्थापना !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाच्या राजकीय इतिहासात आज एका महत्वाच्या अध्यायाची नोंद झाली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच लोकसभेत सेंगोल या राजदंडाची स्थापना देखील करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या संसदेच्या नवीन भवनाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज सकाळी सव्वा सात वाजेपासून हा भव्य उदघाटन समारोह सुरू झाला. याआधी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन केले. यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. याप्रसंगी हवन तसेच सर्वधर्मीय मंत्रोच्चार तसेच प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व धर्मांमधील मान्यवर संत मंडळींची उपस्थिती होती.

पूजेच्या कार्यक्रमानंतर १८ मठांच्या मठाधिपतींनी पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देऊन राजदंड दिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत केल्यानंतर संसद भवनात त्याची स्थापना केली. नवीन संसदेत सेंगोलची स्थापना केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूच्या संतांना अभिवादन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं. दुपारी बारा वाजता मोदी हे देशाला संबोधीत करणार आहेत. तर आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Protected Content