डोंगरकठोरा येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते वृक्षारोपण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी आश्रमशाळांमध्ये वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत यावलच्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १७ शासकीय वस्तीगृह, १७ शासकीय आश्रम शाळा व ३२ अनुदानित आश्रम शाळांनी सहभाग नोंदवला असुन, प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन व्हावे या दृष्टीकोणातुन आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास वृक्षाचे पालकतत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा डोंगरकठोरा येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले आश्रम शाळेच्या विविध परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड मान्यवरांऱ्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांमध्ये आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव), जमीर शेख (उप वनसंरक्षक, यावल विभाग जळगाव जिल्हा),अरुण पवार ( आदिवासी प्रकल्प अधिकारी) व मोहनमाला नाझीरकर (तहसीलदार, यावल) यांचा समावेश होता.

जिल्ह्यातील बारा वन विभागाच्या रोपवाटिकेमधून १२ हजार रोपांचा मोफत पुरवठा करण्यात आला. यावल एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प व यावल वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये एकाच दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आश्रम शाळांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

वृक्ष रोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात व ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते. तसेच, वृक्ष जमिनीची धूप थांबवतात, पाण्याची शुद्धता राखतात व जैवविविधता वाढवतात. वृक्षामुळे उष्णतेची लाट कमी होते आणि पर्यावरणातील संतुलन राखण्यास मदत होते. हवामान बदल हे एक गंभीर आव्हान आहे, आणि वृक्ष लागवड हे त्याविरुद्ध एक प्रभावी उपाय आहे. वृक्ष वातावरणातील ग्रीनहाऊस वायूंची मात्रा कमी करतात, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी होते. त्यामुळे, वृक्ष लागवड हा पर्यावरण रक्षण व हवामान बदलावर नियंत्रण आणण्यासाठी एक महत्वपूर्ण उपाय आहे.

या वृक्ष रोपण कार्यक्रमामुळे पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध व सुरक्षित पर्यावरणाची हमी देईल असे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले.

उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यासह यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख , आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्यासह प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना वृक्षरोपण करण्याचा संदेश दिला की,वृक्ष लागवड हे आपले कर्तव्य आहे आणि त्यामुळे मिळणारे फायदे खूप मोठे आहेत. वृक्ष लागवडीमुळे पर्यावरण सुधारते, हवेतील प्रदूषण कमी होते, आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाची हमी मिळते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, ते या संदेशाला आपल्या जीवनात लागू करून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा. कार्यक्रमाचे नियोजन अरुण पवार प्रकल्प अधिकारी यावल प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली पवन पाटील ,आर एम लोवणे (सहाय्यक प्रकल्प अधिकारी ) जावेद तडवी (आदिवासी कार्यालय निरिक्षक ) व शिक्षण विभाग, प्रकल्प कार्यालय यावल) व यावल पर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे व पश्चिम विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे , रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी केले.

Protected Content