घरासमोरून व्यापाऱ्यांची कार लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयोध्या नगर परिसरातील चिमुकले बालाजी मंदिराजवळ पार्किंगला लावलेली एका व्यापाऱ्याची अडीच लाख रुपये किमतीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आली. याबाबत सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बबनराव सर्जेराव थोरवे (वय-५२) रा. चिमुकले बालाजी मंदीर, अयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते त्यांची कार क्रमांक (एमएच १९ सीयु ०३५८) घरी आले. त्यावेळी त्यांनी घरासमोर त्यांची कार पार्किंग करून लावली होती व जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची अडीच लाख रुपये किमतीची कार चोरून नेली. सकाळी ५ वाजता बबनराव थोरवे हे मॉर्निंग वॉक करण्यासाठी उठले असता घरासमोर त्यांची कार त्यांना दिसून आली नाही. त्यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही मिळून आली नाही. अखेर सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक इमरान सय्यद करीत आहे.

Protected Content