जळगाव प्रतिनिधी | जिल्हयात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत त्याचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीकोनातून पुढील नियोजन आवश्यक असल्याचे सांगत वेळीच उपाययोजना करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
दि 23 नोव्हेंबर, 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. सभेच्यापूर्वी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाबाबत मे.रासी सीडस प्रा.लि., कावेरी सिडस कंपनी, मे.महिको लि. यांनी तयार केलेल्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. यानंतर सभेत विषयाच्या अनुषगाने ‘सर्वदूर झालेला पाऊस व लांबलेल्या कालावधीमुळे शेतकऱ्यांकडून कापूस पिकाचे हंगाम वाढविण्याची शक्यता आहे. पिकाचा हंगाम वाढल्यास गुलाबी बोंडअळीसाठी अखंडीत अन्नपुरवठा होत राहिल्याने या किडीचा प्रादुर्भाव वाढत जाईल यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्या कराव्यात’ अशा या बैठकीत सूचना देण्यात आल्या.
जिल्हा खरीप .हंगाम 2022 मध्ये कापूस पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रचार व प्रसार करुन शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरीता कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व कापूस बियाणे कंपनी यांची संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत खरीप हंगाम 2022 मध्ये बोंड अळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सद्यस्थितीत कापूस पिकाची फरदड घेण्यापासून शेतकरी बांधवांना परावृत्त करुन रब्बी हंगामात हरभरा, गहु, रब्बी ज्वारी व मका यांची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात येत असून यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना हरभरा, गहु, रब्बी ज्वारी व मका बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
डॉ. पुरुषोत्तम देवांग, शास्त्राज्ञ, मे. क्रॉपजीवन ॲग्रो रिसर्च अँड डेवहोलपमेंट प्रा. लि. बेंगलूर यांच्या बोंडअळी नियंत्रणासाठी अद्यावत तंत्रज्ञानाची नोंद घेण्यात आलेली असून याबाबत कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रात्यक्षिके घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या सभेत दिल्या आहेत. या सभेत जिल्हा अधिक्षक संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे , कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद वैभव शिंदे, कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद पी.एस.महाजन, मोहिम अधिकारी जिल्हापरिषद अविनाश काबरा, अध्यक्ष जिनींग व प्रेसिंग असोसिएशनचे सुशिल सोनवणे, प्रमुख कापुस बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी एमएमबी हे उपस्थित होते.
सद्यस्थितीत शेतकरी बांधवांनी कापूस पिकावर अनावश्यक किटकनाशकांचा वापर न करणे व फरदड न घेता कपाशीच्या प-हाटयापासून कंपोस्ट खत तयार करावे व हेच खत टाकल्यास जनिनीची सुपिकता वाढेल असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव व कृषी विभाग यांचेमार्फत करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे