जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा आणि रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या दोन गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार एका गुन्हेगाराला नागपूर तर दुसऱ्याला अमरावती कारागृहात रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवारी २८ मार्च रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीत्रकान्वये कळविले आहे.
रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय-२२) रा. तांबापुरा, जळगाव याला नागपूर कारागृहात तर दुसरा गुन्हेगार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याला अमरावती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. जळगाव शहरासह धुळे जिल्हा, चोपडा तालुक्यात दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरांवर हल्ला तसेच घरफोडी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशी हत्यार सोबत ठेवणे असे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख आणि आणि रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे यांच्यावर दाखल आहेत. दरम्यान यामध्ये रिजवान उर्फ काल्या याच्यावर २१ गुन्हे तर रितेश उर्फ चिच्या याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल आहे. जळगाव शहरात व जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन्ही गुन्हेगारांविरोधात स्थानबध्द करण्यासाठी अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी प्रस्ताव पडताळणी करून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केले. त्यानुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवार २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता गुन्हेगार रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय-२२) रा. तांबापुरा, जळगाव आणि रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्यावर स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवार २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.