आजपासून रंगणार गुलाबी कसोटी

pink ball

कोलकाता वृत्तसंस्था । भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून कोलकात्यातील प्रसिद्ध इडन गार्डन्सच्या मैदानावर दुपारी १ वाजता रंगणार आहे. प्रकाशझोतातील आणि गुलाबी चेंडूने खेळली जाणारी भारताची पहिली कसोटी असून या कसोटीसाठी भारतीय संघ कसा असणार आहे, याचे वेगळे महत्त्व असून याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे आल्यानंतर सारे चित्र पालटले आणि गुलाबी चेंडूची ही कसोटी व्हावी, या त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रकाशझोतातील कसोटी खेळण्यासाठी कर्णधार विराट कोहलीचे मन वळवताना गांगुली यांना अवघे तीन सेकंदच लागले. त्याने त्वरित या कसोटीला होकार भरला. बांगलादेश संघ भारत दौऱ्यावर येण्याआधीच गांगुली यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी संवाद साधून प्रकाशझोतातील कसोटी खेळण्यासाठी त्यांचे मन वळविले. आता हा भारताचा प्रकाशझोतातील पहिलावहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना इडन गार्डनवर होणार असल्याने कोलकाता शहर गुलाबी बनले आहे. पहिली कसोटी भारताने एक डाव आणि १३० धावांनी जिंकून आधीच आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे या दुसऱ्या कसोटीतील निकालातून काही वेगळे हाती लागण्याची शक्यता नाही. तरीही गुलाबी चेंडूने खेळण्याचा वेगळा अनुभव दोन्ही संघांना मिळणार आहे. एरवी कुकाबुरा कंपनीच्या चेंडूंचा वापर केला जात असताना या कसोटीसाठी मात्र एसजीचे चेंडू वापरले जाणार आहेत. त्यांचा परिणाम नेमका कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेषतः संधीप्रकाशाच्या कालावधीत या चेंडूवर नजर बसणे कठीण आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे हा अनुभव कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच प्रकाशझोतात दवाचा गोलंदाजांच्या कामगिरीवर कसा परिणाम होईल, याचीही उत्सुकता असेल.

संघ

भारत :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, हनुमा विहारी, कुलदीप यादव, शुभमन गिल.

बांगलादेश :- मोमिनूल हक (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), मेहिदी हसन, नयीम हसन, अल-अमिन हुसैन, ईबादत हुसैन, मोसादीक हुसैन, शदमान इस्लाम, तैजूल इस्लाम, अबू जायेद, इम्रूल कायेस, महमुदुल्ला, मोहम्मद मिथुन, मुशफिकूर रहिम, मुस्ताफिझूर रहमान.

 

Protected Content