पिंक ऑटो मोफत प्रशिक्षण शिबिराला उत्साहात सुरुवात


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पाऊलवाट ठरणाऱ्या पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षण शिबिराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रोटरी क्लब ऑफ जळगाव आणि मराठी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचा प्रारंभ आज दुपारी रोटरी हॉल, गणपती नगर येथे करण्यात आला.

रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. पूनम मानूधने आणि रोटरीयन डॉ. सुद्धा कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, महिलांना या वेळी लर्निंग लायसन्सही वितरित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या स्वयंपूर्णतेचा पहिला टप्पा पार पडला.

या सोहळ्याला रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, सचिव पराग अग्रवाल, माजी अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, रितेश जैन, नितीन काळुंखे, चंदन महाजन, प्रीती महाजन यांच्यासह मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, विश्वस्त सौ. निलोफर देशपांडे, प्रा.सविता नंदनवार, सौ. अनुराधा रावेरकर आणि सौ.खुशबू जुबेर देशपांडे उपस्थित होते. या शिबिरात अनुभवी पिंक ऑटो रिक्षा चालक सौ. रंजना सपकाळे महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यांनी आपल्या अनुभवातून या क्षेत्रातील संधी, अडचणी आणि उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी अनेक महिलांनी सहभाग नोंदवत आपली जिद्द दाखवली. योगिता पाटील (चोपडा), प्रतीक्षा राणे, रेश्मा पाटील, बेबी बारी, मनीषा ढाके, अनिता अहिरे आणि संध्या पाटील यांनी उत्स्फूर्तपणे प्रशिक्षण घेतले. रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे १५ महिलांना पिंक ऑटो रिक्षा घेण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. सागर चित्रे यांनी दिली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ८ महिलांचे प्रशिक्षण आज सुरू करण्यात आले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, लवकरच जळगावमध्ये १५ नव्या पिंक ऑटो महिला चालक-मालक तयार होतील. या माध्यमातून महिलांना स्वतंत्र व्यवसायाची संधी मिळणार असून सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठीही मोठे पाऊल उचलले जाईल. हा उपक्रम महिलांसाठी केवळ रोजगाराची संधी नव्हे, तर त्यांच्या आत्मनिर्भरतेचा आणि सामाजिक सशक्तीकरणाचा नवा अध्याय ठरणार आहे. भविष्यात जळगावच्या रस्त्यांवर महिला चालकांच्या पिंक ऑटो रिक्षा धावतील, आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहती याची खात्री आजच्या कार्यक्रमाने दिली आहे.