फापोरे बु. येथे शेत पाणंद रस्त्याचे निकृष्ट काम; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील फापोरे बु. येथील सिताराम महाराज मंदिरासमोरील शेत पाणंद रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला असून, स्थानिक शेतकरी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असूनही काम दर्जाहीन झाल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी फक्त खडी टाकण्यात आली असून, आवश्यक तेवढ्या प्रमाणात मुरूमाचा वापर झालेला नाही. शिवाय, काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक पाईप बसविण्यात आलेले नाहीत, यामुळे भविष्यात रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता आहे.

शेत पाणंद रस्त्याची योजना ही शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती कामांसाठी मोठा फायदा देणारी आहे. मात्र, जर काम अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे होत राहिले, तर या योजनेचा लाभ अल्पकाळच मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Protected Content