‘या’ कारणामुळे जळगाव जिल्ह्यातील परमिट रूम व हॉटेल चालकांचा बंद !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारने परमिट रूमसाठी व्हॅट 10% आणि लायसन्स फी 15% वाढवल्याच्या निर्णयाविरोधात जळगाव जिल्ह्यातील 650 परमिट रूम धारकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या वाढीव करांचा निषेध करत परमिट रूम धारकांनी एकदिवसीय बंद पुकारला असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

परमिट रूम असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ललीत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना या संदर्भात आपल्या संघटनेची भूमिका मांडली. ते म्हणाले की, परमीटधारकांना प्रशासनाकडून अनेक अडचणी येत आहेत. यापूव व्हॅट 5% होता, तो आता 10% करण्यात आला आहे, तर लायसन्स फी 15% वाढवली आहे. या निर्णयामुळे परमिट रूम व्यवसाय अडचणीत आला असून, व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत आहे.

ललीत पाटील पुढे म्हणाले की, परमिट रूम बंद पडल्याने सरकारच्या महसुलातही मोठी घट होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे सरकारला तीन कोटींपेक्षा जास्त महसुलाचा तोटा होऊ शकतो, तसेच वेटर, भाजी व नॉनव्हेज सप्लायर, लिकर सप्लायर्स यांसारख्या अनेक लहान व्यवसायांवरही परिणाम होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून यावर कार्यवाही न झाल्यास परमिट रूम धारकांनी 2025-26 साठी लायसन्सचे नूतनीकरण न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, तर परमिट रूमच्या चाव्या शासन दरबारी जमा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसात प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासून परमीट रूम हे बेमुदत बंद राहण्याची शक्यता असल्याचे संकेत आजच्या निवेदनातून मिळाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडे सहाशे परमीटरूम्स आणि हॉटेल्सच्या संचालकांनी यासाठी एकतेची वज्रमूठ आवळल्याचे देखील दिसून आले आहे.

वाढीव व्हॅट आणि लायसन्स फीच्या विरोधात राज्यभरात वातावरण तापले आहे. सध्या महाराष्ट्रातील विविध भागांतही हाच विरोध सुरू असून, याला व्यापक आंदोलनाचे रूप मिळण्याची शक्यता आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खाली पहा याबाबतचा व्हिडिओ :

Protected Content