जळगाव प्रतिनिधी । पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या कामासाठी लागणारे साहित्य विक्री व दुरुस्ती करणारे दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 या अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळेत खालील बाबींचा समावेश करण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लास्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इत्यादी वस्तू विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने व घटक सुरु राहतील. तसेच 15 ते 20 मे या कालावधीत चक्रीवादळामुळे तसेच आगामी येणाऱ्या मान्सून कालावधीत घर तसेच इतर बांधकाम यांची दुरुस्ती, सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनेसाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने व घटक सुरु राहतील.
या नमूद आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्ष 45 वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. या बाबींशी निगडीत असणाऱ्या सर्व व्यक्ती कोविड-19 नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. नियमांचे उल्लघंन करणारे दुकान मालक, चालक व घटक यांचेकडून रुपये 10 हजार मात्र दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोविड -19 चा संसर्ग कमी होईपर्यंत सदरचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.
या सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.