पी.-जे. रेल्वेचे मलकापूरपर्यंत होणार ब्रॉडगेजचे विस्तारीकरण !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते जामनेर पर्यंत धावणारी ब्रिटिश कालीन नॅरोगेज ही पॅसेंजर रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात पाचोरा येथील समविचारी नागरिकांनी एकत्रित येऊन पी. जे. बचाव कृती समिती गठीत करुन वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढुन प्रशासनास वारंवार निवेदने देऊन ही बंद करु नये अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्याचीच फलश्रुती म्हणून रेल्वे प्रशासनाने पाचोरा येथील पी. जे. बचाव कृती समितीच्या रास्त मागण्यांचा विचार करत पाचोरा ते जामनेर (पी. जे.) या नॅरोगेज पॅसेंजर गाडीचे ब्राॅडगेज मध्ये रुपांतर मलकापूर पर्यंत विस्तारीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने नुकतेच राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध केले असल्याची माहिती पी. जे. बचाव कृती समितीचे पदाधिकाऱ्यांनी पाचोरा येथील हुतात्मा स्मारकात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी खलिल देशमुख, अॅड. अविनाश भालेराव, सुनिल शिंदे, भरत खंडेलवाल, प्रा. गणेश पाटील, अनिल (आबा) येवले, नंदकुमार सोनार, पप्पु राजपुत, प्रा. मनिष बाविस्कर, शाहबाज बागवान, संजय जडे उपस्थित होते.

सुमारे १०२ वर्षांपासून धावणारी ब्रिटिश कालीन पाचोरा ते जामनेर ही पॅसेंजर रेल्वे कोरोना काळापासुन ते आजतागायत रेल्वे प्रशासनाने बंद केले आहे. गोर गरिबांसाठी जीवनवाहिनी समजल्या जाणारी ही रेल्वे प्रशासनाने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पाचोरा सह शेंदुर्णी, पहुर, भगदरा, जामनेर येथील समविचारी व्यापारी, प्रवाशी, समाजीक कार्यकर्ते, शेतकरी यांना सोबत घेत पी. जे. बचाव कृती समिती गठीत करण्यात आली. समिती गठीत झाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी धरणे आंदोलन, मोर्चे काढुन पाचोरा ते जामनेर ही रेल्वे बंद करु नये, तसेच पाचोरा ते जामनेर या रेल्वेचे मलकापूर पर्यंत ब्रॉडगेजमध्ये विस्तारीकरण करण्यात यावे. या मागण्यांसाठी रेल्वेचे जी.एम., डी.आर.एम., रेल्वे राज्यमंत्री यांच्या भेटी घेवुन ही रेल्वे पाचोरा ते मलकापूर येथील प्रवाशांसाठी किती सोयीची आहे. याचे महत्त्व पटवुन दिल्यानंतर त्यावेळचे जी. एम. अनिल लाहोटी यांनी याविषयी पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावत रेल्वे प्रशासनाने पाचोरा ते जामनेर या नॅरोगेज रेल्वे पाचोरा ते मलकापूर पर्यंत (ब्रॉडगेज) विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला असुन या मार्गावरील रेल्वे लाईन लगत असलेल्या पाचोरा येथील ३ शेतकरी, वरखेडी ता. पाचोरा – ५, शेंदुर्णी ता. जामनेर – ४, पहुर ता. जामनेर – १४, मोयेगाव ता. जामनेर येथील ५ अशा ३१ शेतकऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडुन नोटीस देखील प्राप्त झाली आहे. व लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. या निर्णयाचे स्वागत करत एकंदरीत पी. जे. बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून पी. जे. बचाव कृती समितीच्या पाचोरा, शेंदुर्णी, पहुर, भागदरा, जामनेर, मलकापूर येथील पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, प्रवाशी, शेतकरी यांच्यात आनंदाचे वातावरण बघावसाय मिळत आहे.

Protected Content