धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जनता हाच माझा समाज असून जनतेला कामे आवडत असतात. आणि मी देखील कामांच्या माध्यमातूनच त्यांची अविरत सेवा करत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते शहरातील महापुरूषांच्या सहा स्मारकांचे लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी त्यांनी धरणगाव शहरातील २७ कोटी रूपयांच्या पाईपलाईनच्या कामाला वेग आला असून लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरवासियांना दररोज शुध्द पाणी पुरविण्यात येणार असल्याचे नमूद केले. दरम्यान, आजच ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी ८० लाख रूपयांची तरतूद करून तयार करण्यात आलेल्या २ शौचालयांचेही लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी शहरातील सहा ठिकाणी विविध चौकांमध्ये सुशोभीकरणाच्या कामांना मंजूर करण्यात आले होते. यासोबत ना. पाटील यांच्याच पुढाकाराने प्रत्येकी ८० लाख रूपयांच्या शौचालयांची आठ ठिकाणी निर्मिती करण्यात आली होती. यातील सहा शौचालयांचे आधी लोकार्पण करण्यात आले होते. यातील मशीद अली व परिसरातील शौचालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी गटनेते पप्पू भावे, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, भाजपचे माजी नगरसेवक कैलास माळी, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, तालुका प्रमुख गजानन पाटील, भानुदास विसावे, मोतीआप्पा पाटील, दिलीप पाटील, मंगलदास भाटीया आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर पालकमंत्र्यांसह मान्यवरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल – ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ना. गुलाबराव पाटलांसह मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक विजय महाजन यांनी केले. यात त्यांनी ना. गुलाबभाऊंच्या माध्यमातून शहर विकासाला गती मिळाली असून यात आपल्या प्रभागातील कामे देखील झाल्याचे नमूद केले.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या भाषणातून धरणगाव शहरातील कामे ही तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातूनच झाली असून याच्या पूर्णत्वाला वेग आल्याचे आवर्जून नमूद केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून धरणगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असून याच्या माध्यमातून केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शहरातील प्रमुख समस्या ही पाण्याची आहे. शहरात सध्या २७ कोटी रूपयांची तरतूद असणार्या जलवाहिन्यांची कामे सुरू आहेत. याला आता वेग आला असून लवकरच पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणगावकर नागरिकांना दररोज शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. तसेच शहरातील महात्मा फुले नगरातील नाला हा भूमिगत करण्यात येणार असल्याचेही ना. पाटील म्हणाले. याप्रसंगी काही शेतकर्यांनी निवेदन देऊन पारोळा रेल्वे गेट ते सार्वे खुर्द या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रार केली. यावर सदर रस्त्याला दर्जोन्नत करून रस्ता विकसित करणार असल्याची घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. हाच धागा पकडून ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, गुलाबराव वाघ आणि आम्ही सोबत सुमारे ३० वर्षे काम केले आहे. आता आमचे मार्ग वेगळे असले तरी आजवरचे ऋणानुबंध हे वैयक्तीक आयुष्यात कायम राहतील यात शंकाच नाही. आमच्या राजकीय भूमिका म्हणजे विचारांची लढाई होय. यात वैयक्तीक संबंध आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जनहिताच्या कामांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. टी. पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन भाजपचे नगरसेवक कैलास माळी यांनी केले.