राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही – शरद पवार

sharad pawar and uddhav thackeray

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची आग्रही मागणी करत आमच्यापुढे सरकार स्थापनेचे पर्याय उपलब्ध असल्याचा दावा करत भारतीय जनता पक्षाला सूचक इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र त्यांच्या दाव्यातली हवा काढून टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कधीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.

 

सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचा खुलासा त्यांनी केला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशीही कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान अयोध्या प्रकरणाच्या निकालापूर्वी भाजप- शिवसेनेने राज्यात सुरू केलेला सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवावा, असा टोला पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला आहे.

मुख्यमंत्री आमचाच होणार असे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या भूमिकेला मोठे महत्त्व आले आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सध्या भाजप-शिवसेना हे दोन पक्ष भांडत आहेत. मात्र, यात जो पक्ष दमेल त्याला नमते घ्यावे लागणार आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरले तरी ते बहुमताचा आकडा गाठू शकतील, असे वाटत नाही. हे पाहता भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून आपले बोलणे झालेले नाही. आम्ही शेवटचे संसदेत बोललो त्याला तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. हे पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या राजकारणाबाबत आपले आणि सोनिया गांधींचे कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नसल्याचे पवार म्हणाले.

Protected Content